लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांना राजस्थानमधून अटक

0
550

लोणावळा, दि. २ (पीसीबी) – सुनिल वॅक्स म्युझियममध्ये २ लाख ४५ हजारांची चोरी करुन पसार झालेल्या तिघा चोरट्यांना लोणावळा पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे.

याप्रकरणी वॅक्स म्युझियमचे व्यवस्थापक अनिलकुमार तामराशन यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, मोतीराम छत्राराम ओटावत (वय २२), हरिराम मोतीराम चव्हाण (वय २०) व शंकर चौहान (वय २३, सर्व रा.दानवरली गाव, जि. पाली राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.२७ मार्च) रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास तिघा आरोपींनी तोंडाला कपडा बांधत वॅक्स म्युझियमच्या ग्रिलमधून प्रवेश केला. तसेच कॅश काऊंटरमधील दोन लाख रुपये रोख, दोन मॉनिटर आणि एक एलईडी टिव्ही चोरुन थेट राजस्थानला पसार झाले. चोरट्यांपैकी दोन जणांनी वॅक्स म्युझियमच्या कॉफी शॉपमध्ये पूर्वी काम केलेले असल्याने त्यांना याठिकाणची माहिती होती. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाने सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपी मोतीराम, हरिराम आणि शंकर यांची ओळख पटवून त्यांना राजस्थान येथून अटक केली. तसेच आरोपींकडून १ लाख ४२ हजार रुपयांची रोकड आणि एक मॉनिटर जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड अधिक तपास करत आहेत.