लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविला जाईल – शरद पवार

0
607

अहमदनगर, दि. ३१ (पीसीबी) – देशात आता विरोधकांना परिवर्तन हवे आहे. त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन राज्यात-राज्यात आघाडी करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविला जाईल, असे स्पष्ट करून  राहुल गांधी जाहीर सभांमधून मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नसल्याचे सांगतात, माझेही नाव येते; मात्र त्याला काही अर्थ नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.  

अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमाचा समारोप पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,  प्रत्येक राज्यात जास्त संख्याबळ असणारा पक्ष क्रमांक एकचा राहील. निवडणुकीनंतर आम्ही एकत्र बसू, त्यानंतर पर्याय देऊ. २००४ मध्ये निवडणूक झाल्यानंतर एकत्र बसून निर्णय घेऊन यूपीएची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर देशाला दहा वर्षे स्थिर सरकार दिल्याची आठवणही पवार यांनी यावेळी करून दिली.

पवार पुढे म्हणाले की, केंद्र सरकार  उच्च न्यायालय, सीबीआय, आरबीआयसारख्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करत आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचे मिशेल प्रकरणावरून दिसत आहे. एकूणच देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन पवार यांनी यावेळी केले.