लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राज्यात ५७ टक्के मतदान

0
533

मुंबई, दि. २९ (पीसीबी) –  राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज (सोमवार)  पार पडले. राज्यात चौथ्या टप्प्यासाठी एकूण ५७ टक्के मतदान झाले. तर चारही टप्प्यांचे मिळून एकूण ६१ टक्के मतदान झाले. यामध्ये गडचिरोलीत सर्वाधीक ७२ टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी कल्याणमध्ये ४४ टक्के मतदान झाले. पत्रकार परिषदेत  राज्य निवडणूक आयोगाने  ही माहिती दिली. २०१४ प्रमाणे यंदाही मतदान झाल्याचे यावेळी आयोगाने सांगितले.

चौथ्या टप्प्यात मुंबई, नाशिक आणि मावळमध्ये  मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला.  तर कल्याणमध्ये मतदारांनी निराशा केली. मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागात सेलिब्रेटींनी उत्साहात मतदान केले. राज्यात चौथ्या टप्प्यात २५ ठाणे हा सर्वात मोठा मतदारसंघ होता. यामध्ये २१ लाख ६० हजार मतदार होते. तर दक्षिण मुंबई हा सर्वात छोटा मतदारसंघ होता. यामध्ये १४ लाख ४० हजार मतदार होते.

राज्यात चारही टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी ७ लाख ५० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव १ लाख ४ हजार पोलीस नियुक्तीवर होते. अशा प्रकारे एकूण साडे आठ लाख कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. निवडणूक काळात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी १७ हजार ५०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर १५७ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.