बनावट रेमडेसिवीर तयार करणारे तीन कारखाने पोलिसांनी उघडकीस आणले, पाच जणांना अटक

0
254

 – दोन हजाराहून अधिक कोरोना रूग्णांना रेमडेसिवीरची बनावट इंजेक्शन्स विकली

हरिद्वार, दि.३० (पीसीबी) : बनावट रेमडेसिवीर बनवणाऱ्या टोळीचा भंडाफोड दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला आहे. उत्तराखंडमधील हरिद्वार, रुड़की आणि कोटद्वारमधील बेकायदेशीर कारखान्यांमध्ये ही टोळी बनावट रेमडेसिवीरची निर्मिती करत होती. या टोळीच्या नेत्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी पोलिस चौकशीत सांगितले की त्यांनी आतापर्यंत कोरोना रूग्णांना दोन हजाराहून अधिक रेमडेसिवीरची बनावट इंजेक्शन्स विकली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लोक २५ हजार रुपयांना रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकत असत. आरोपींकडून पोलिसांनी रेमडेसिवीरची १९७ बनावट इंजेक्शन्स जप्त केली आहेत. तसेच पोलिसांना इंजेक्शनच्या तीन हजार रिकाम्या वायल्स देखील सापडल्या आहेत. या टोळीने आत्तापर्यंत दोन हजाराहून अधिक कोरोना रुग्णांना रेमडेसिवीरची बनावट इंजेक्शन्स विकली असल्याचे तपासात पुढे आले आहे. दिल्ली गुन्हे शाखा आणि उत्तराखंड पोलिसांचे पथक या प्रकरणात पौरी जिल्ह्यातील कोटद्वारमध्ये पुढिल चौकशी करत आहेत. पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन्स ताब्यात घेतले आहेत, ज्यावर कोटद्वारच्या कारखान्याचे नाव लिहिले आहे.