रूपी सहकारी बँक खातेधारकांसाठी मोठी खुशखबर…

0
302

मुंबई, दि.पिंपरीचिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – गेल्या काही वर्षांपासून पुण्यात मुख्यालय असलेली रूपी बँक मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या या बँकेचं राज्य बँकेत विलिनीकरण करण्याचा देखील प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने फेटाळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल १०७ वर्ष जुन्या रुपी बँकेचे ठेवीदार आणि खातेदार प्रचंड चिंतेत सापडले होते.

या ठेवीदारांना आपल्या ठेवींची चिंता सतावू लागली होती. मात्र, या सर्व ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सहकार क्षेत्रातीलच मोठं नाव असलेल्या सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेने रूपी बँक ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भातला प्रस्ताव सारस्वत बँक प्रशासनाने रूपी बँक आणि त्यासोबतच रिझर्व्ह बँकेला देखील पाठवला आहे.
इंडियन कोऑपरेटिव्हने दिलेल्या वृत्तानुसार, सारस्वत बँकेचे संचालक गौतम ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. “रुपी बँकेचे काही ठेवीदार आम्हाला सातत्याने बँक ताब्यात घेण्यासंदर्भात विनंती करत होते. आर्थिक संकटाचं प्रकरण आणि इतर गोष्टींचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर आम्ही ही बँक ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे”, असं गौतम ठाकूर म्हणाले.
दरम्यान, सारस्वत बँकेने पाठवलेल्या प्रस्तावानुसार, रूपी बँकेच्या सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवल्या जातील. विशेषत: ज्या ठेवीदारांच्या ठेवी ५ लाखांपेक्षा जास्त आहेत, त्यांना सुमारे ६ टक्क्यांपर्यंतचा परतावा देखील दिला जाणार असल्याचं सारस्वत बँकेचे संचालक गौतम ठाकूर यांनी जाहीर केलं आहे. याशिवाय, बँकेचा परवाना हा प्रामुख्याने पुणे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या इतर भागात वापरला जाईल, हे देखील ठाकूर यांनी सांगितलं. हा परवाना महाराष्ट्राच्या बाहेर वापरला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती.