रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
563

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या समर्थकांसह  काँग्रेसमध्ये  प्रवेश केला .  आंबेडकर यांनी  दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी आंबेडकर यांनी दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मागे घेत असल्याची घोषणाही केली. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे दिल्लीत काँग्रेसची ताकद वाढली  आहे, असे  शीला दीक्षित यांनी सांगितले.

केवळ काँग्रेस पक्षच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण शकतो, असे आनंदराज यांनी पक्ष प्रवेशानंतर म्हटले. दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या विजयासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी समर्थकांना केले.  यावेळी रिपब्लिकन सेनेच्या दिल्ली विभागाचे प्रमुख राकेश त्रिपाठी यांच्यासह त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दिल्ली विभागाचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष राजेश प्रजापतींसह अनेक कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच यावेळी घोंडा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार बी. टी शर्मा आणि दिल्ली प्रदेश पूर्वांचल गण परिषदेचे अध्यक्ष निर्मल पाठक यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.