राहुल गांधींची मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

0
599

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हैदराबाद येथील एका वृत्तपत्राला दिलेली मुलाखत पेड न्यूज होती.  त्यामुळे राहुल यांनी मतदारांना काँग्रेसकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी केला आहे. याप्रकरणी भाजपने निवडणूक आयोगाकडे   राहुल यांच्याविरोधात तक्रार दिल्याचे नकवी यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी ६ डिसेंबर रोजी एका वृत्तपत्राला दिलेली मुलाखत ही पेड न्यूजच होती. त्यातून मतदारांना काँग्रेसकडे आकृष्ट करण्याचा आणि त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली  आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, असे नकवी यांनी सांगितले.

दरम्यान, राहुल यांनी या मुलाखतीत एका सर्वेक्षणचा आधार घेत  पाचही राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, असा  दावा केला होता. ही मुलाखत पेड न्यूजच्या श्रेणीत येत असल्याने नियमानुसार मतदानाच्या ४८ तास आधी कोणीही निवडणूक प्रचार करू शकत नाही किंवा मुलाखत देऊ शकत नाही. मात्र, राहुल यांनी जाणूनबुजून मुलाखत देऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप नकवी यांनी केला.