राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हिंदू नाहीत- शंकराचार्य स्वरूपानंद

0
639

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हिंदू नाहीत, कारण ते वेद मानत नाहीत. जी माणसं हिंदू धर्मातील वेद अमान्य करतात ती हिंदू कशी काय? असा प्रश्न उपस्थित करत धर्मगुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक ग्रंथ आहे. जो गुरुजी गोळवलकर यांनी लिहिला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की हिंदू एकतेचा आधार हा वेद असू शकत नाही. जर आपण वेद हा हिंदू एकतेचा आधार मानला तर बौद्ध आणि जैन हे आपल्यापासून वेगळे होतील तेदेखील हिंदू आहेत. संघाचे लोक वेद मानत नाहीत त्यामुळे ते हिंदू नाहीत असा खळबळजनक आरोप शंकराचार्य स्वरूपानंद यांनी केला आहे.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांच्या या दाव्यामुळे संघाकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वरूपानंद यांनी हा दावा केला आहे. वेद हा हिंदू धर्माचा मुख्य आधार आहे. जे लोक वेदांमधील धर्म आणि अधर्म मानतात ते हिंदू आहेत. वेदशास्त्र मानणाऱ्यांना आस्तिक मानलं गेलं आहे. जो आस्तिक असतो तोच हिंदू असतो असंही स्वरूपानंद यांनी म्हटलं आहे. याआधी त्यांनी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यावरही टीका केली आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर या स्वतःला साध्वी म्हणवून घेतात मात्र त्या साध्वी नाहीत. जर त्या साध्वी असतील तर त्या आपल्या नावापुढे ठाकूर हे आडनाव का लिहितात? असाही प्रश्न स्वरूपानंद यांनी विचारला आहे.

साधू किंवा साध्वी त्याच माणसाला म्हणता येतं ज्याचं समाज जीवन संपुष्टात आलं आहे. तो ऐहिक सुखापासून दूर आहे. साधू-साध्वी हे कधीही स्वतःचं कौटुंबिक जीवनात रमत नाहीत. प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं मात्र असं नाही. त्याचमुळे त्यांना मी साध्वी मानतच नाही असंही स्वरूपानंद यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर साध्वी प्रज्ञा यांनी बोलताना जीभेवर संयम ठेवला पाहिजे असाही सल्ला दिला होता.

लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा १२ मे रोजी भोपाळमध्ये होणार आहे. या ठिकाणी भाजपाने साध्वी प्रज्ञा यांना तिकिट दिलं आहे. तर काँग्रेसने दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली आहे. शहीद करकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर बरीच टीका झाली. तो वाद कुठे संपुष्टात येत नाही तोच शंकराचार्य स्वरूपानंद यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. महत्त्वाची बाब ही की काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह हे स्वामी स्वरूपानंद यांचे शिष्य आहेत आणि या दोघांमध्ये घरोबा आहे. त्याचमुळे हा वाद स्वामींनी निर्माण केला का? असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.