राष्ट्रवादी युवकमधील एकलव्य साहेबांसाठी अंगठाच काय देह सुद्धा देतील

0
796

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – राष्ट्रवादीतील शिलेदार पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सोडून जात असताना पडत्या काळात राष्ट्रवादी युवकने पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे.    राष्ट्रवादी युवकमध्ये एकलव्य आहेत.  ते साहेबांसाठी अंगठाच काय देह सुद्धा देतील, अशी ग्वाही राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी युवकची आज (रविवार) मुंबईत बैठक  झाली. यावेळी रविकांत वरपे  यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर हल्ला चढवला. पळपुट्यांना पळू द्या… आपण एकलव्य आहोत; विधानसभा जिंकून साहेबांना गुरूदक्षिणा देऊ, असे म्हणत रविकांत वरपे यांनी कार्यकर्त्यांमध्ये  जोश भरण्याचा प्रयत्न केला.

सर्व एकलव्य  एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना बळकट करून साहेबांना गुरुदक्षिणा म्हणून आगामी विधानसभा निवडणूक जिंकून देतील, असा विश्वास वरपे यांनी यावेळी व्यक्त केला.  दरम्यान, पक्षांतर हे सर्व आम्ही अनुभवले आहे, त्याला कसे उत्तर द्यायचे हे ही आम्हाला ठाऊक आहे आणि पुन्हा पक्ष कसा उभा करायचा याची ही आम्हाला काळजी आहे,  असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात म्हटले आहे.