राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलिनीकरण ? राहुल गांधी-शरद पवार भेट  

0
720

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन होण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरूवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी  भेट घेतली.  या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुख्य काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या दृष्टीने राहुल आणि पवार यांच्यात चर्चा झाली, अशी माहिती  विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. त्याचबरोबर महाराष्ट्रातही राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतल्यास इतिहासाची पुनरावृत्ती ठरेल. शरद पवारांनी यापूर्वी १९८६ मध्ये त्यांची समाजवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये विलीन केली होती. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये हे विलीनीकरण  झाले होते.

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला, तर लोकसभा आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते. काँग्रेसकडे सध्या केवळ ५१ खासदारांचे संख्याबळ आहे. लोकसभेचे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे किमान ५५ खासदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीकडे  ५ खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेमध्ये विलिन केल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांचे संख्याबळ ५५ पेक्षा जास्त होईल, त्यामुळे त्यांना अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.