राष्ट्रवादी पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा झालेली नाही; शरद पवारांचा खुलासा

0
342

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन होण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा झालेली नाही, असे पवारांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरूवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी  भेट घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात असून या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.  या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुख्य काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या दृष्टीने राहुल आणि पवार यांच्यात चर्चा झाली, अशी माहिती  समोर आली होती. यावर शरद पवारांनी खुलासा केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत  काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचा (संपुआ) दारुण पराभव झाला.  या नामुष्कीजनक पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी   कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला होता.  हा प्रस्ताव कार्यकारिणीने एकमताने फेटाळला होता.  या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी  दुपारी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. या दोन्ही नेत्यांमध्ये अद्याप चर्चा सुरू आहे.