राष्ट्रवादीला भगदाड; युवा नेते शेखर गोरे यांचा शिवसेनेत प्रवेश

0
552

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – माण खटाव तालुक्याचे युवा नेते शेखर गोरे यांनी मुंबई येथे ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

शेखर शिवसेनेत गेल्याने माण खटावच्या राजकारणात भूकंप झाला असून समीकरणे बदलली आहेत. शेखर गोरे यांना माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे तिकीट देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.

काल उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून व खांद्यावर भगवा ध्वज देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी नितीन बानुगडे-पाटील, दगडूदादा सपकाळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

गोरे यांनी काही दिवसांपूर्वी फलटणमध्ये आयोजित कार्यकर्ता बैठकीत खुद्द शरद पवार यांच्या समोर राडा घातला होता. पक्षातील कोणीही पवारांच्यापुढे मोठ्या आवाजाने बोलण्याची हिम्मत करत नसताना गोरे यांनी घातलेला राडा गाजला होता. शेखर गोरे हे माणचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांचे भाऊ आहेत, गोरे यांनी आपल्याच भावाच्या विरोधात जात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसेकडे बहुमत असताना देखील गोरे यांना पराभव पत्कारावा लागला होता. पक्षातील गटबाजीमुळेच आपण पराभूत झाल्याचा आरोप यावेळी यांनी यापूर्वी केला होता.