राष्ट्रवादीत नसता, तर आपणास आमंत्रण देण्यासाठी कोणीही आले नसते – रोहीत पवार  

0
745

पुणे, दि. २७ (पीसीबी) – संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या किंवा नेते असे लावले जाते. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसता, तर आपणास आमंत्रण देण्यासाठी कोणीही आले नसते, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू आणि जिल्हा परिषद सदस्य रोहीत पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक  नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर   रोहित पवार यांनी  पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना फेसबुक पोस्टद्वारे टोला लगावला आहे.

रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की,  ‘संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या किंवा नेते असे लावले जाते आणि त्यानंतरच त्यांची दखल घेतली जाते. हे त्यांना देखील माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसता तर आपणास आमंत्रण देण्यासाठी कोणीही आलं नसतं. तसंही पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची व्यक्तिगत कारणे असतील देखील पण एखाद्या व्यक्तीच्या पक्ष सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेले कधीही चांगलेच असते.