विदर्भातील माजी मुख्यमंत्र्यांचा पुतण्या राष्ट्रवादीला रामराम करणार?   

0
436

यवतमाळ, दि. २७ (पीसीबी) –  राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळतीसत्र कायम आहे. मुंबई अध्यक्ष सचिन आहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीदेखील पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीला विदर्भात  मोठा  धक्का बसण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पुतण्या आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक हे लवकरच शिवसेनेत प्रवेश  करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघ  राष्ट्रवादीचा बालेकिल्ला  मानला जातो.  नाईक परिवार हा राष्ट्रवादीशी एकनिष्ठ मानला जातो. मात्र या विधानसभेला इंद्रनील यांनी राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. इंद्रनील नाईक यांचा शिवसेना प्रवेश  झाल्यास राष्ट्रवादीला जिल्ह्यात मोठा फटका बसणार आहे.