राष्ट्रवादीचे हे ज्येष्ठ आमदार भाजपच्या वाटेवर…

0
665

सोलापूर, दि. ६ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामधील एक एका आमदार युतीच्या गळाला लागताना दिसत आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपल, करमाळ्याच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे.

माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार बबन शिंदे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. शिंदे हे तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चाकरून राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे त्यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. मात्र काही कारणांमुळे त्यांचा प्रवेश थांबला होता. आता पुढील टप्यात होणार भाजपच्या ‘मेगाभरती’मध्ये ते प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

बबन शिंदे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आहेत, त्यांचे बंधू संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांची त्यांचा पराभव केला होता. शिंदे बंधू यांनी मध्यंतरी पूरग्रस्तांना निधी देण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.