गडकिल्ले भाडेतत्त्वावर: “जे औरंगजेबाला जमले नाही ते महाराष्ट्र सरकारने करून दाखवले”

0
405

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – राज्यातील किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) अशा २५ किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसेच हॉटेल उभारण्यासाठी देण्यात येणार आहेत. हे गड- किल्ले फक्त हॉटेलच नाही तर लग्नसमारंभ आणि करमणुकीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या निर्णयावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला असून जे औरंगजेबाला जमले नाही ते महाराष्ट्र सरकारने करून दाखवले अशी टीका केली आहे.

अमोल कोल्हे यांनी आपल्या व्हिडीओ शेअर करत आपले मत मांडले आहे. “ज्या असंख्य मावळ्यांनी हे गडकोट राखण्यासाठी बलिदान दिले त्यांचा हा अपमान आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे. “डेस्टिनेशन वेडिंग कोणाला परवडणार आणि ज्यांना परवडणार त्यांना “आपल्या” इतिहासाची कितपत जाण आणि भान असणार?,” असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. “महाराष्ट्राचा स्वाभिमान” असा चव्हाट्यावर आणण्याचे कारण काय? अशी संतप्त विचारणाही त्यांनी केली आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, “शिवसृष्टी नसेल तर शिवचरित्रातला त्या गडाशी संबंधित एखादा प्रसंग उभा राहू शकतो. त्यातून पर्यटनाला वेगळी चालना मिळू शकते. जवळपास किती वेगळ्या जातींचे पक्षी या गडकोटांवर असणाऱ्या वनात आहेत. तेथील जीवसृष्टीचे रक्षण केले जाऊ शकते. आणि तिथे येणाऱ्या लोकांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल,”.

“शाश्वत विकासाचा विचार करुन आणि त्याहीपलीकडे जाऊन इतिहासाशी प्रामाणिक राहून या गडकिल्ल्यांच्या बाबतीच विचार करावा,” अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे.