राष्ट्रवादीचे घड्याळ बिघडले असून ते आता भंगारातच जाणार – भाजप

0
437

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – भाजपने साकारलेला ‘रम्या’ सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर हल्ला चढवत आहे. यावेळी रम्याचे डोस या मालिकेतून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीचे घड्याळ बिघडले असून ते आता भंगारातच जाणार, अशी टीका भाजपने रम्याचे डोसच्या माध्यमातून केली आहे.

अजित पवार यांनी तडकाफडकी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. या राजीनाम्याची कल्पना   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील  नव्हती.  परंतु त्यानंतर शरद पवार सांगतील तो अंतिम निर्णय असेल, असेही त्यांनी म्हटले होते. आता भाजपाने रम्याचे डोस या मालिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

ईव्हीएम, कलम ३७० असो किंवा भगवा झेंडा.. दोघांची मत परस्पर विरूद्ध. दादांनी राजीनामा सुद्धा काकांना न विचारता दिला आणि त्यांना भेटल्यावर दादा म्हणतायत “काका सांगतील तो अंतिम निर्णय” असं एक व्यक्ती रम्याशी संभाषण करताना दाखवण्यात आली आहे. त्यावर रम्याही त्यांना उत्तर देतो. अरे हे घड्याळ ना… एक फटका दिला की थोडावेळ बरोबर चालतंय. पण नंतर मिनिट काटा आणि तास काटा विरूद्ध दिशेने फिरायला लागतात. हे आता काही दुरूस्त होणार नाही… भंगारातचं जाणार, असे रम्या त्या व्यक्तीला सांगताना दाखवण्यात आले आहे.