मनसेचा मुंबईत सोमवारी मेळावा; राज ठाकरेंच्या घोषणेकडे लक्ष

0
393

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा मुंबईतील वांद्रे येथील   एमआयजी क्लब या ठिकाणी सोमवारी (दि.३०) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच राज ठाकरे इच्छुक उमेदवारांसोबत संवाद साधणार आहेत.

मनसे १०० जागा लढवणार अशीही माहिती समोर आली होती. मात्र त्याबाबत राज ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. याबाबतची घोषणा राज ठाकरे सोमवारी करण्याची शक्यता आहे.

निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी राज ठाकरेंनी घेतली होती. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणूक ईव्हीएमवरच होणार हे स्पष्ट केले होते. त्यामुळे मनसे निवडणुकीतून माघार घेणार अशी चर्चा सुरू झाली होती.  मात्र मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मते आजमावून  राज ठाकरे यांनी त्यांचा निर्णय बदलला आहे, असेही समजते.

दरम्यान मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेसने विरोध दर्शवला नाहीतर माझी काही हरकत नव्हती, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. आता राज ठाकरे सोमवारी  कोणती भूमिका जाहीर करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.