राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा; उध्दव ठाकरेंची केंद्र सरकारला विचारणा

0
441

अयोध्या, दि. २४ (पीसीबी) – राम मंदिरासाठी किती दिवस वाट बघावी लागणार  आहे?, असा सवाल करत राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा, अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सरकारला सुचक  इशारा दिला आहे.  त्यांनी शिवनेरीहून आणलेल्या मातीची अयोध्येत पूजन करण्यात आले.  त्यानंतर ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.  

आता हिंदू वाट बघणार नाही, तो प्रश्न विचारणारच असे सांगत संसदेत कायदा केला, तर शिवसेना पाठीशी राहिल. मात्र, राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा,  असे ठाकरे म्हणाले. अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी आलो, राजकारणासाठी नाही,  असे सांगत पहिल्यांदाच अयोध्येत आलो आहे. आता  झोपलेल्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी पहिल्यांदाच अयोध्येत आलो आहे. यापुढे  वारंवार येत राहीन, असेही ते म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी कायदा करून राम मंदिर उभारावे ,अशी मागणी केली. मोदींनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी टीका करत दिलेला शब्द मोदी सरकारने पाळावा, असेही त्यांनी  म्हणाले. यावेळी ठाकरे कुटुंबियांच्या हस्ते संकल्प पूजन केले. या आशिर्वाद उत्सवाला संत महंतांची उपस्थिती होती.