रामविलास पासवानांच्याविरोधात त्यांच्याच मुलीने दिला आंदोलनाचा इशारा    

0
627

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांना ‘अंगठा छाप’नेत्या म्हटल्याप्रकरणी लोक जनशक्तीचे पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याविरोधात त्यांची मुलगी आशा देवी यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पासवान यांच्या ‘अंगठा छाप’या विधानावर आशा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  त्यांनी रामविलास पासवान यांना राबडी देवींची माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना काही अंगठा छाप नेते मुख्यमंत्री होतात, असे  पासवान यांनी  म्हटले होते. यावर आपल्या वडिलांनी  माजी मुख्यमंत्री राबडी देवींवर निशाणा साधताना संपूर्ण महिला समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी राबडी देवी यांची माफी मागितली पाहिजे. नाहीतर मला माझ्या वडिलांविरोधातच आंदोलन करावे लागेल. मी पक्षाच्या कार्यालयाबाहेर धरणे करेन. त्यांच्या हाजीपूर मतदारसंघात त्यांच्याविरोधात प्रचार करेन, असा इशारा आशा देवी यांनी दिला आहे.

माझी आई अंगठा छाप होती म्हणूनच तिला सोडले होते, असेही आशा यांनी म्हटले. विशेष म्हणजे आशा यांचे पती साधू पासवान यांनी नुकताच राजदचे सदस्यत्व घेतले आहे. तर दुसरीकडे जीतनराम मांझी यांनी रामविलास पासवान यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे.  दरम्यान पासवान यांच्या विधानानंतर बिहारमध्ये  आता नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.