राफेल करारासंबंधी महत्त्वाची कागदपत्रे चोरीला; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

0
532

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – राफेल लढाऊ विमान खरेदी करारासंबंधीची महत्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती   महाधिवक्ता के. के. वेणूगोपाळ यांनी आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात दिली. तर चोरीप्रकरणी सरकारने काय कारवाई केली, याचा खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

राफेल प्रकरणी १३ डिसेंबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयावर दाखल फेरविचार याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली.

यावेळी सरकारच्या वतीने बाजू मांडताना महाधिवक्ता के. के. वेणूगोपाळ  यांनी सांगितले की,  ‘राफेल’संबंधी महत्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून कर्मचाऱ्याकरवी चोरीला गेली आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

याचिकाकर्ते अॅड.  प्रशांत भूषण आणि दोन वृत्तपत्रांसह अन्य व्यक्ती चोरी गेलेल्या कागदपत्रांवर विश्वास दाखवत आहेत. त्यामुळे त्यांना अधिकृत गोपनीयता कायद्यान्वये खटल्याला सामोरे जाऊ शकते. आम्ही दोन वर्तमानपत्रे आणि एका ज्येष्ठ वकिलाविरोधात कारवाई करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी न्यायालयात दिली.