राफेलच्या चाकाखाली लिंबू; शरद पवार म्हणतात…

0
471

यवतमाळ, दि. १० (पीसीबी) – मी संरक्षण मंत्री असताना राफेलच्या कंपनीत तत्कालीन सेक्रेटरी व्होरा यांच्यासोबत  गेलो होतो. राफेल उत्तम विमान आहे, यात शंका नाही, आम्हाला राफेल योग्य वाटले. तपासणी करुन आता विमान खरेदी केले गेले याचे स्वागत करतो. पण ज्या पद्धतीने राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवले,  या संरक्षण मंत्र्यांच्या कृतीवर आपल्याकडे बोलायला शब्दच नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

शरद पवार म्हणाले की,  सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी राफेल विकत घेण्याच्या निर्णयाबद्दल मला कोणतीही शंका नाही. पण मी वाचले आहे, ते खरे आहे की नाही मला माहिती नाही परंतू, नव्याने खरेदी केलेल्या ट्रकवर नजर लागू नये, म्हणून लिंबू-मिरची लटकवल्याप्रमाणे राफेल लढाऊ विमानाबाबतही असे केले जात असेल, तर आपण काय बोलणार, असे ते म्हणाले.

नवीन ट्रक घेतला तर त्यावर लिंबू आणि मिरची टांगून ठेवतात. जेणेकरुन त्या ट्रकला शाप लागणार नाही. पण नेमके राफेलला कशाचा शाप लागेल? असा सवाल करत  त्यांना भीती वाटत असेल, त्यामुळे त्यांनी लिंबू ठेवले असेल तर धन्य आहे, असे पवार म्हणाले. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पॅरिसमध्ये राफेल लढाऊ विमानाची पूजा करताना त्याच्या टायरखाली लिंबू ठेवल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते.  यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे.