काश्मिरात ९ लाख जवान कशासाठी? – मुफ्ती

0
367

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा झाली आहे. त्या ठिकाणी सर्व काही पूर्वपदावर आले आहे, असे जर भाजपचे लोक म्हणत असतील तर जम्मू-काश्मीरमध्ये ९ लाख सैनिक काय करीत आहेत?, असा सवाल करीत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. महबुबा मुफ्ती यांनी आज एक ट्विट केले असून त्यातून त्यांनी केंद्र सरकार व भाजपवर जोरदार टीका केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास ९ लाख सैनिक तैनात करण्यात आले आहेत. हे सैनिक पाकिस्तानकडून हल्ले रोखण्यासाठी तैनात करण्यात आले नाहीत. तर जम्मू-काश्मीरमधील लोकांनी विरोध करू नये, रस्त्यावर उतरुन आंदोलन करू नये, लोकांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी या सैनिकांना तैनात करण्यात आले आहे, असा आरोप मुफ्ती यांनी केला आहे. लष्कराची जबाबदारी ही सीमेवरचे संरक्षण करण्याची असते. लोकांचे आंदोनल चिरडून टाकण्याची जबाबदारी ही लष्कराची नाही, असेही मुफ्ती यांनी म्हटलं आहे. पीडीपीचे अध्यक्ष अद्याप नजरकैदेत आहे. त्यांची मुलगी इल्तिजा त्यांच्या ट्विटर अकाउंटवर अॅक्टिव आहे.

महबुबा मुफ्ती यांच्या मुलीने एक ट्विट केले असून त्यात म्हटले की, भाजप मतांसाठी सैनिकांचा वापर करीत आहे. परंतु, काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी लष्कराला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. सत्ताधारी पक्ष जवान असो किंवा काश्मीरमधील लोक त्यांना कशाचीही चिंता नाही. त्यांना फक्त निवडणूक कशी जिंकता येईल, याची चिंता सतावत आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. गुरुवारी तीन काश्मिरी नेत्यांची सुटका करण्यात आल्यानंतर महबुबा मुफ्ती यांनी सरकारवर टीका केली आहे. या नेत्यांना सुटका करण्यासाठी बाँडवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. या नेत्यांना ताब्यात घेणेच मुळात चुकीचे होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.