राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे निधन

0
508

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे आज (सोमवारी) पहाटे निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. कृष्णा यांच्या निधनाने कलाविश्वातून शोक व्यक्त होत आहे. राज कपूर यांनी १९४६ मध्ये कृष्णा यांच्याशी विवाह केला होता. कृष्णा यांच्या पश्चात रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर ही तीन मुले तर रितू नंदा आणि रिमी जैन या दोन मुली असा परिवार आहे. करिना कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर यांच्या त्या आजी होत्या.

गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. ऑगस्टमध्ये त्यांना मुंबईतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावरून कृष्णा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुपम खेर, अभिनेत्री रविना टंडन यांनी ट्विटरच्या माध्यमातून कृष्णा यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.