राज्यात लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक? मंत्रिमंडळाची शुक्रवारी तातडीची बैठक    

0
641

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकासोबत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकत्र घेण्यासाठी राजधानी मुंबईत हालचाली सुरु झाल्या आहेत. शुक्रवारी (दि.८)  तातडीने राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. त्यानंतर  मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर करतील, अशीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र याबाबत अधिकृत सूत्रांकडून कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरूवार) सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे या बैठकीत नेमकी कोणती चर्चा होती, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक घेण्याबाबत निवडणूक आयोगाला एक महिना आधी कल्पना द्यावी लागते. पण, राज्य सरकारने तसे काही आयोगाला कळवलेले नाही, असे काही आमदारांनी सांगितले. पण राज्य सरकारने याबाबत आयोगाला माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका लढवण्यासाठी आम्ही तयार असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत आहे. तर शिवसेनेची   तयार नसल्याचे बोलले जात आहे.