राज्यात गेल्या २४ तासांत ‘एवढे’ पोलीस कोरोनाबाधित; कोरोनायोद्धेच सुरक्षित नाहीत

0
255

मुंबई,दि.२३(पीसीबी) : राज्यात गेल्या २४ तासांमध्ये आणखी २५३ पोलीस कोरोनाबाधित आढळले असून, दरम्यान पाच पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेच. मात्र तरी देखील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता २१ हजार च्या उंबरठ्यावर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३ हजार ४३५ जण, कोरोनामुक्त झालेले १८ हजार १५८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या २३४ जणांच्या संख्येचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

करोनामुक्त झालेल्या १८ हजार १५८ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ९१८ व १६ हजार २४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या २३४ पोलिसांमध्ये २३ अधिकारी व २११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यातील २१ हजार ८२७ करोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार ३८१ अधिकारी व १९ हजार ४४६ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)३ हजार ४३५ पोलिसांमध्ये ४४० अधिकारी व २ हजार ९९५ कर्मचारी आहेत.