राजीनामा द्यायला जिगर लागते – उदयनराजे भोसले

0
404

सांगली, दि. १० (पीसीबी) – निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात प्रचार सभांनी वेग धरला आहे. विधानसभेच्या निवडणुकांसोबतच लोकसभेच्या पोटनिवडणुकांसाठीही मतदान घेण्यात येणार आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कराडमधील भाजपाच्या विधानसभेच्या उमेदवारासाठी प्रचारसभा आयोजित करणअयात आली होती. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी आपल्या स्टाईलमध्ये फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी आपल्या राजीनम्यावर भाष्य करत राजीनामा देण्यासाठी जिगर लागते, असे म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला.

“मी कालही तुमचा होतो, आजही तुमचाच आहे आणि मरेस्तोवरही तुमचाच राहणार. मी राजीनाम्याची पर्वा करत नाही. राजीनामा देण्यासाठी जिगर लागते,” असे उदयनराजे भोसले जनतेला संबोधित करताना म्हणाले. यावेळी त्यांनी कॉलर उडवण्यावर आक्षेप घेणाऱ्यांनाही धारेवर धरले. मी घालतो ते माझे शर्ट, माझी कॉलर त्याचे मी काहीही करेन. ती मी उडवली तर मी बेशिस्त झालो, हा कोणता न्याय आहे, असा सवाल उदयनराजे यांनी यावेळी केला.

काही दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या घडाळ्याची साथ सोडत हाती कमळ घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी दिल्लीत भाजपामध्ये प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. आता त्या जागी २१ ऑक्टोबर रोजीच पोटनिवडणूक पार पडणार आहे.