राजकीय पक्षांकडून व्हॉट्सअॅपचा दुरूपयोग; भारतातील सेवा बंद होण्याची शक्यता

0
744

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) –  भारतातील राजकीय पक्षांकडून व्हॉटस्अॅपचा वापर मतदारांची दिशाभूल करण्यासाठी किंवा खोट्या बातम्या पसरवण्यासाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत व्हॉटस्अॅपचा अशाप्रकारे दुरूपयोग होत राहिल्यास   भारतातील सेवा बंद करण्याबाबत विचार केला जाईल,  असे व्हॉट्सअॅपचे कम्युनिकेशन प्रमुख कार्ल वूग यांनी म्हटले आहे.

भारतातील  राजकीय पक्षातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवण्यासाठी व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग करत आहेत, असे आढळून आले आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांना भडकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फेक बातम्या पसरवण्याची शक्यता आहे, अशी भीतीही वूग यांनी व्यक्त  केली आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी  आपला सोशल मीडिया सेल कार्यान्वित केला आहे. गावापासून, जिल्हा पातळीपर्यंत कार्यकर्त्यांना सोशल मीडिया सेलची पदे दिली आहेत. त्यांच्याकडून व्हॉट्सअॅपवर अफवा पसरवण्याचे कामही मोठ्या प्रमाणात होत  आहे. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होत आहे. तसेच विपरीत प्रकारही घडू लागले आहेत.  हे सर्व बंद करण्यासाठी व्हॉट्सअॅपने कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

आपला पक्ष इतर पक्षांपेक्षा कसा वेगळा आहे, हे दाखवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या  कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यामुळे कार्यकर्ते  सोशल मीडियावर कोणत्याही पातळीला जात असताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक वेळा वाद टोकाला जातात. या पार्श्वभूमीवर आगामी  लोकसभा निवडणुकांसाठी व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग थांबवा, असा इशारा व्हॉट्सअपने राजकीय पक्षांना दिला आहे.