रस्ते सफाईच्या निविदा मंजूर करू नका, चौकशी करा – राष्ट्रवादी नगरसेवक दत्ता साने यांची मागणी

0
551

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रस्त्यांची यांत्रिकीकरणाद्वारे सफाई करण्याचा विषय गेल्या दोन महिन्यांपासून बंद असून या निविदेमध्ये सहभागी झालेले सहा ठेकेदार संगनमताने आणि रिंग करून सहभागी झाले आहेत .त्यामुळे रस्त्यांच्या यांत्रिकीकरणाद्वारे सफाई करण्याच्या विषयाला मंजूरी देण्यात येऊ नये. रिंग करून ठेका घेणा-या ठेकेदारांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक दत्ता साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात साने यांनी म्हटले आहे की, पिंपरी – चिंचवड शहरातील रस्ते यांत्रिकीकरणाद्वारे सफाई करण्याची 746 कोटी रुपयांची निविदा महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आली होती. ही निविदा प्रसिद्ध झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत वादग्रस्त ठरली होती. आर्थिक लागेबांधे , सातत्याने बदलेल्या अटी शर्ती , भ्रष्टाचार , नियमांचे उल्लंघन आणि वाढीव खर्च या बाबींमुळे ही निविदा पहिल्याच दिवसापासून संशयाच्या भोवऱ्यात अडकली होती . निविदेमध्ये सहभागी झालेले सहा ठेकेदार संगनमताने आणि रिंग करून सहभागी झाले असून ही निविदा रद्द करावी.

या यांत्रिकीकरणाच्या विषयाला मंजुरी दिल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर 150 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे . लॉकडाऊनमुळे रस्ते यांत्रिकीकरणाद्वारे कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आहे . मोठे कोणतेच विषय हाती न घेण्याबाबत तसेच अंदाजपत्रकाच्या 33 टक्के खर्चाची अंमलबजावणी करण्याचे राज्य शासनाचे आदेश असतानाही हा विषय रेटण्याचा नेमका हेतू काय? याचे स्पष्टीकरण मिळावे, अशी विनंती साने यांनी केली आहे.

संबंधित विषयाला मंजूरी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, तसेच होणाऱ्या नुकसानीस प्रशासन म्हणून आयुक्त श्रावण हर्डीकर जबाबदार असतील याचीही नोंद घेण्यात यावी, असा इशाराही दिला आहे.