योग्य त्यावेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करणार- देवेंद्र फडणवीस

0
397

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात पोहोचले आहेत. दरम्यान, पुरामुळे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच आवश्यक त्या वेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करणार असल्याचेही ते म्हणाले. गुरूवारी मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थितीची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

केंद्र सरकारही राज्यातील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील आवश्यक ती मदत पुरवणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील एकंदरीत पूरपरिस्थिती पाहत कर्नाटक सरकारनेही अलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

सांगली आणि कराड दोन्ही ठिकाणी उतरणे सोयीचे नसल्याने हवाई पाहणी केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वेगवेगळ्या धरणातल्या विसर्गामुळे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेकांची मदत आपण घेतली. ओदिशा, पंजाब, गोवा आणि राज्यातली पथकं या ठिकाणी बचावकार्यात सहभागी झाले आहेत. सांगलीतील स्थिती सर्वाधिक भीषण असून काही भाग सोडला तर संपूर्ण शहर पाण्याखाली आहे. कालपर्यंत ११ पथके तेेथे बचावकार्यात सहभागी होती. आज नौदल, एनडीआरएफची अतिरिक्त पथके  त्या ठिकाणी पोहोचली आहेत. तर काही पथके केंद्राकडूनही येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली

ब्रह्मनाळ येथे लोकांना सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने बोट सोडली होती. त्या बोटीत ३०-३५ जण त्यात बसले होते. परंतु त्या बोटीच्या इंजिनमध्ये फांदी गेल्याने ती बोट उलटली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्या ठिकाणी आता बोटी वाढवल्या आहेत. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. पूर परिस्थिती असलेल्या ठिकाणी एअरलिफ्टींगही करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच सध्या कराडची पाणीपातळी कमी झाली आहे. धोक्याची परिस्थिती कमी झाली आहे. कोल्हापुरातही सध्या बचावकार्य सुरू आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील २२३ गावं पुरामुळे बाधित झाली आहेत. तर १८ गावांना पूर्णपणे पाण्याने वेढा बसला आहे. १५२ ठिकाणी ३८ हजार लोक कॅम्पमध्ये असून काही ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना राज्य सरकार मदत करणार आहे. तसेच पडलेल्या घरांकरिता आणि अन्यधान्यासाठीही राज्य सरकार मदत करत आहे. तसेच आवश्यक ती अतिरिक्त मदत करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूर परिस्थितीमुळे २ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे. तो कसा चालू करता येईल यावरही विचार सुरू आहे. तसेच पाणी ओसरल्यानंतर लवकरात लवकर वीज पुरवठा सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. तसेच आवश्यक औषधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गरज भासल्यास हवाई मार्गाने औषधे पुरवली जाणार असल्याचे ते म्हणाले. तसेच कोल्हापूर, सांगली या ठिकाणी सध्या पेट्रोल डिझेलची टंचाई आहे. बचाव कार्यासाठी प्रामुख्याने ते कसे पोहोचवता येईल यावर विचार सुरू आहे. शुक्रवारपर्यंत महामार्ग खुला झाल्यास पेट्रोल डिझेल पोहोचवण्यात येईल. अन्यथा दुसरा पर्याय विचारात घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले