यूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज

953

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – केंद्र सरकारकडून खासगी क्षेत्रातील व्यक्तींसाठी सहसचिव पदाच्या १० जागांसाठी तब्बल ६००० हून अधिक अर्ज आले आहेत. सरकारने खासगी क्षेत्रातील योग्य व्यक्तीला संधी देण्याच्या उद्देशाने या पदांसाठी अर्ज मागवले होते. कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने ‘लॅटरल एंट्री’ अंतर्गत सहसचिव पदाच्या १० जागांवर नियुक्तीची घोषणा केली होती. या अंतर्गत खासगी क्षेत्रातील कर्मचारी करारातंर्गत सरकारशी जोडले जाऊ शकतात. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ६,०७७ अर्ज प्राप्त झाले आहेत.

महसूल, आर्थिक सेवा, अर्थ व्यवहार, कृषी, शेतकरी हित, रस्ते आणि परिवहन, जहाज व बंदरे, पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन, अपारंपारिक ऊर्जा, विमान आणि वाणिज्य विभागात सहसचिव पदाची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख ही ३० जुलै होती.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने अर्ज छाननी करण्याचे काम सुरू केले आहे. सामान्यपणे सहसचिव पदासाठी यूपीएससीद्वारे आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस नियुक्त केले जातात. मनमोहन सिंग सरकारच्या काळात योजना आयोगाचे उपाध्यक्ष राहिलेले माँटेकसिंग अहलुवालिया यांचीही ‘लॅटरल एंट्री’ द्वारेच नियुक्ती करण्यात आली होती. अशा नियुक्तींमुळे प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांवर चुकीचा प्रभाव पडणार नाही, अशी ग्वाही सरकारने गेल्या महिन्यात संसदेत दिली होती.