युवक काँग्रेस झोपलेली, चक्क भाजपा नेत्याची सरचिटणीसपदी निवड

0
337

भोपाळ, दि. २३ (पीसीबी) – मध्य प्रदेशात युवक काँग्रेसकडून चक्क भाजपा नेत्याची सरचिटणीस पदी निवड करण्यात आल्याने टीकेला सामोरं जावं लागत आहे. पक्ष सोडून भाजपात प्रवेश केलेल्या नेत्याची युवक काँग्रेसने सरचिटणीसपदी निवड केल्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. यानंतर पक्षाने तात्काळ चुक दुरुस्त केली. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

शुक्रवारी भाजपा हर्षित सिंघई यांना नवी जबाबदारी मिळाल्याबद्दल अनेकांनी शुभेच्छा देणारे संदेश पाठवण्यास सुरुवात केली. हर्षित सिंघई यांना नेमकं काय सुरु आहे हेच कळत नव्हतं. कारण मार्च महिन्यातच त्यांनी ज्योदिरादित्य सिंधिया यांच्यासोबत काँग्रेस पक्ष सोडत भाजपात प्रवेश केला होता. पण तरीही काँग्रेसच्या रेकॉर्डमध्ये मात्र हे अपडेट करण्यात आलं नव्हतं.

युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका शुक्रवारी संपल्या आणि यावेळी हर्षित सिंघल यांची १२ मतांनी निवड करण्यात आली. “हास्यास्पद बाब म्हणजे कोणालाही निवडणुकीत रस नव्हता आणि माझी सरचिटणीसपदी निवड झाली. सिंधियांसोबत मी १० मार्चला पक्ष सोडला. तीन वर्षांपूर्वी मी युथ काँग्रेस निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दिला होता,” असं हर्षित सिंघई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर या निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यात येत होत्या.

“जेव्हा मी सिंधियांसोबत भाजपात प्रवेश केला तेव्हा काँग्रेसला माझं नाव निवडणुकीतून वगळण्याची विनंती केली होती. पण त्यांनी तसं काही केलं नाही. मी परत फोन केला तेव्हा त्यांनी ईमेल करत पक्ष सोडण्याची कारणं देण्यास सांगितलं. मी कलमनाथ आणि राहुल गांधी यांना लिहिलं होतं. युथ काँग्रेस संपूर्ण मध्य प्रदेशात हेच करत आहे. जे पक्षात नाहीत त्यांनी निवडून आणत आहे,” अशी टीका हर्षित सिंघल यांनी केली आहे. दुसरीकडे युथ काँग्रसने हर्षित सिंघल जाणुनबुजून पक्षाची बदनामी करत असल्याचा आरोप केला आहे.