मल्लांना पाळावी लागणार वेळ

0
393

नवी दिल्ली, दि. 23 (पीसीबी) : कुस्ती ना आफलीच आहे, कधीही गेले तरी चालेल. काही होत नाही ही भावना आता मल्लांना बाळगून चालणार नाही. राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी भारतीय कुस्तीगीर महासंघाने कडक आचारसंहिता निर्माण केली असून, तिचे पालन करावेच लागणार आहे. करोनाचे संकट कमी होऊ लागल्यावर आता भारतीय कुस्ती महासंघाने राष्ट्रीय स्पर्धेचा कार्यक्रम जाहिर केला आहे. स्पर्धा यशस्वी आणि कुठल्याही अडचणीशिवाय पार पडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी असे महासंघाने प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

महासंघाने स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक तत्वांबरोबर स्वतःची स्वतंत्र नियमावली तयार केली असून, ती पाळणे बंधनकारक आहे. यामुळे मल्लांना आता स्पर्धेच्या ठिकाणी लढतीशिवाय घोटाळता येणार नाही. स्पर्धेचे वेळापत्रक पाळणे त्यांना बंधनकारक असेल. मल्लांनी दिलेल्या दिवशी आणि वेळेत उपस्थित रहावे अशा सूचना आपल्या मल्लांना द्याव्यात असे आवाहन महासंघाने सर्व राज्य संघटनांना केले आहे. लढत असो किंवा वजन प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग हे पाळले जाणार आहे.

लढतीच्या मुख्य केंद्रावर ज्यांच्या लढती आहेत ते मल्ल आणि प्रशिक्षक यांच्याशिवाय इतर कुणाला प्रवेश नसेल. तसेच, वजनाबाबत नियम करण्यात आला आहे. ज्या मल्लांची वजने असतील, तेच मल्ल तेथे उपस्थित असतील. यांच्या खेरीज दुसरा मल्ल केंद्रावर आढळल्यास त्याला स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात येणार आहे. स्पर्धा तीन गटात होईल. प्रथम फ्री-स्टाईल, नंतर महिला आणि शेवटी ग्रीको-रोमन गटातील लढती होतील. आमचा कार्यक्रम सुरू होणे महत्वाचे आहे. ऑलिंपिकसाठी पात्रता स्पर्धा लवकरच सुरू होतील. त्यासाठी आपल्या मल्लांनी तयार असणे महत्वाचे आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले आहे. सर्व राज्य संघटनांचे सहकार्य अपेक्षित असून, त्यांनी स्पर्धेसाठी प्रत्येक वजन गटासाठी केवळ एकच मल्ल पाठवावा.

-ब्रजभूषण शरण सिंग, अध्यक्ष भारतीय कुस्तीगीर महासंघ

राष्ट्रीय स्पर्धा उत्तर प्रदेशात होणार असल्या तरी पुरुष आणि महिलांच्या स्पर्धांचे केंद्र वेगळे आहे. पुरुषांच्या फ्री-स्टाईल लढती २३ आणि २४ जानेवारीस उत्तर प्रदेशात नोयडा येथे होतील. त्यानंतर महिलांच्या स्पर्धा या उत्तर प्रदेशातच आग्रा येथे आणि पुरुषांच्या ग्रीको-रोमन लढती पंजाबमध्ये होतील. महिलांच्या स्पर्धा २८ ते २९ जानेवारी दरम्यान होतील. तीनही विभागात दहा वजन गटात लढती होतील.

बुधवारपासून सराव शिबिर
गेल्यावर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्यांचे शिबिर बुधवारपासून साईच्या सोनीपत येथील केंद्रावर सुरू होईल. प्रत्येक वजन गटातीर पहिले तीन मल्ल शिबीरासाठी पात्र धरले जातील. पुरुष आणि महिलांच्या ऑलिंपिक वजन गटातीर शिबिरही यापूर्वीच सुरू झाले आहे. पुरुषांचे सोनीपत आणि महिलांचे लखनौ येथे हे शिबिर सुरू आहे.