माजी अध्यक्ष ब्लॅटर यांच्याविरुद्ध ‘फिफा’ची तक्रार

0
186

जिनिव्हा, दि. 23 (पीसीबी): फुटबॉलची शिखर संघटना ‘फिफा’ने माजी अध्यक्ष सेप ब्लॅटर यांच्याविरुद्ध झ्युरिच येथील फुटबॉल संग्रहालयाच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला. फुटबॉल संग्रहालयाच्या संदर्भात ‘फिफा’चे तत्कालिक अध्यक्ष आणि एकूण व्यवस्थापनाने नियुक्त केलेल्या कंपन्यांनी केलेले एकूणच व्यवहार हे गैरव्यस्थापनाचे होते. त्या विषयी ‘फिफा’च्या सध्याच्या व्यवस्थापनाने झ्युरिच सरकारी वकिलाकडे तक्रार दाखल केली होती. ब्लॅटर यांनी थेट प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप हे निराधार असल्याचे त्यांचे वकिल लोरेन्झ अर्नी यांनी सांगितले. त्यांनी ‘फिफा’च्या नव्या व्यवस्थापाने केलेल्या गैरकृत्याच्या आरोपाचा तीव्र शब्दात इन्कार केला.

संग्रहालय व्यवस्थापनाने तब्बल ४६२ दशलक्ष युरोचे बिल दाखल केले आहे. संग्रहालयाच्या व्यवस्थापनावर झालेला हा खर्च खरे, तर जागतिक फुटबॉलच्या विकासासाठी वापरता आले असते, असे फिफाच्या सध्याच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. फिफाचे उपमहासचिव अलस्डेअर बेल म्हणाले,’एकूणच परिस्थिती लक्षात घेता आमच्यासमोर सरकारी वकिलांना खटल्याचा अहवाल देण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. आम्ही फिफाच्या सध्याच्या व्यवस्थापनाचे सदस्य आहोत. आमच्यावरही संघटनेची जबाबदारी आहे. आम्ही पण हे लपविण्याची चूक केली, तर आम्ही ही जबाबदारी टाळल्याचे वाटेल.’ फिफाचे झ्युरिच येथील फुटबॉल संग्रहालयाचे काम ब्लॅटर यांनी जरी सुरू केले असले, तरी त्याचे उदघाटन हे त्यांचे उत्तराधिकारी फिफाचे विद्यमान अध्यक्ष गियानी इन्फान्टिनो यांच्या हस्ते झाले. ब्लॅटर यांची हकालपट्टी झाल्यानंतर इन्फान्टिनो यांची नियुक्ती करण्यात आली होती. युईएफएचे तत्कालिन सर्वेसर्वा मिशेल प्लॅटिनी यांना २० लाख स्विस फ्रॅंक इतके पैसे देण्यावरून ब्लॅटर यांना सहा वर्षांसाठी फुटबॉलमधून निलंबित करण्यात आले होते.

फिफाने केलेल्या या तक्रारीचे विशेष म्हणजे, विद्यमान अध्यक्ष इन्फान्टिनो यांची देखील आर्थिक गैरव्यवहारावरून स्वित्झर्लंडच्या विशेष न्यायालयात चौकशी सुरू असताना ही तक्रार करण्यात आली आहे. फिफाचे माजी अॅटर्नी जनरल मायकेल लॉबर यांच्याशी २०१६ आणि २०१७ मध्ये झालेल्या विशेष बैठकीवरून ही चौकशी सुरू आहे. या संदर्भात चौकशी करणारे स्टिफन केलर म्हणाले,’इन्फान्टिनो यांनी २०१७ मध्ये एका खासगी विमानाच्या वापराबद्दल ही फौजदारी चौकशी सुरू आहे.’