…या कारणामुळे मनोहर जोशींच्या मुलाने ‘कोहिनूर’वर पाणी सोडले

0
2008

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – दादरमधील २ हजार कोटींच्या कोहिनूर स्क्वेअर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी याला पाणी सोडावे लागले आहे. ९०० कोटींचे कर्ज न फेडल्याने जोशी यांना हा प्रोजेक्ट  गमवावा लागला आहे. प्रभादेवीमधील आर्किटेक कंपनी संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्सला हा प्रोजेक्ट मिळाला  आहे. 

बँकांकडून घेतलेले ९०० कोटींचे कर्ज  कोहिनूर ग्रूपला फेडता आले नाही. यामुळे संबंधित बँकांनी जून २०१७ मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे धाव घेतली होती. ट्रिब्यूनलने प्रकल्प संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्सला देण्याची शिफारस स्विकारल्याने उन्मेश जोशी यांना हा प्रकल्प सोडावा लागला.

दादरमध्ये शिवसेना भवनसमोर असणाऱ्या कोहिनूर स्क्वेअर इमारतीचे काम २००९ मध्ये कोहिनूर ग्रुपकडून सुरु केले होते. या ठिकाणी आशियातील सर्वात मोठे पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येणार होते. मात्र, २०१३ मध्ये ५२ आणि ३५ माळ्याच्या दोन भव्य इमारती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. एका इमारतीत पंचतारांकित हॉटेल्स आणि दुसरी इमारत पूर्णपणे रहिवासी करण्याचे ठरवण्यात आले होते.  मात्र, दोन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम पूर्णपणे थांबले होते.