पाकिस्तानात ईश्वरनिंदा केल्याप्रकरणी हिंदू पशुवैद्यकीय डॉक्टरला अटक; परिसरात तणाव

0
446

सिंध, दि. २८ (पीसीबी) – पाकिस्तानात ईश्वरनिंदा केल्याप्रकरणी हिंदू पशुवैद्यकीय डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. एका स्थानिक धर्मगुरुने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ही घटना पाकिस्तानातील सिंध प्रांतात घडली.

रमेश कुमार असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टराचे नाव आहे. तर संतप्त आंदोलनकर्त्यांनी हिंदूंच्या मालकीच्या दुकानाची जाळपोळ केली असून रस्त्यांवर टायर जाळण्यात येत आहेत.

स्थानिक मशिदीचे धर्मगुरु मौलवी इशक नोहरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. डॉक्टर रमेश कुमार यांनी पवित्र धर्मग्रंथाची पाने फाडून त्यामधून औषधे देत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी डॉक्टर रमेश कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. दरम्यान परिसरात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी रमेश कुमार यांना सुरक्षित ठिकाणी नेले असून घटनेची रितसर चौकशी करण्यात येत आहे. सिंध प्रांत आणि कराचीत हिंदूंची संख्या जास्त आहे. हिंदू अल्पसंख्यांक असून अनेकदा त्यांना टार्गेट केले जात आहे. वैयक्तिक शत्रुत्वातून अल्पसंख्यांकाविरोधात ईश्वरनिंदा केल्याच्या तक्रारी होत आहेत.