…म्हणून मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या विजयी जल्लोष कार्यक्रम रद्द केला

0
660

नागपूर, दि. २४ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीत अपेक्षेइतके यश भाजपाला मिळालेले नाही हे निकालाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. २२० जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या युतीला मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत १६० जागांपर्यंत मजल मारता आली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघातील भाजपच्या विजयी जल्लोष कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी सातच्या सुमारास नागपूरात विजयी झाल्यानंतर निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणारे प्रमाणपत्र घेण्यासाठी नागपूरमध्ये दाखल झाले. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे प्रमाणपत्र घेतल्यानंतर फडणवीस जल्लोष कार्यक्रमात सहभागी होऊन एका विजयी मिरवणूकीमध्ये सहभागी होणार होते.

मात्र राज्यात भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्याने ते प्रमाणपत्र घेतल्यानंतर लगेच मुंबईला परतणार आहेत. मुख्यमंत्र्यांची विजयी मिरवणूकही रद्द करण्यात आली आहे. भाजपला नागपूर आणि विदर्भातही अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळेच ही मिरवणूक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबरोबर राज्यातही राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.