मोशीत मैला मिश्रीत पाण्यासाठी बंदिस्त ‘ड्रेनेज’ लाईन टाकावी – अण्णा जोगदंड

0
224

पिंपरी दि. ३ (पीसीबी) – मोशी येथील तापकीरनगर मधील साईकृपा कॉलनीमध्ये सांडपाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बंदिस्त गटार लाईन नसल्यामुळे तेथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मैला मिश्रित पाण्यासाठी गटार लाईन टाकण्याकरिता खासगी जागेतून जावे लागते. त्याला खासगी जागा मालकाचा विरोध असून हे न्यायप्रविष्ठ प्रकरण झाले. त्यामुळे पालिकेने पर्यायी जागेची निवड करून त्या ठिकाणाहून बंदिस्त गटर लाईन टाकण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर म्हणाले की न्यायप्रविष्ठ प्रकरण आहे असे सांगून पालिकेने पळ न काढता ताबडतोब उपाययोजना कराव्यात. स्वच्छ व आरोग्यदायी पर्यावरणाचा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. याचा पालिकेने गांभीर्याने विचार करून पर्यायी व्यवस्था करावी.

महिला अध्यक्षा मीना करंजावणे म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या स्वच्छता क्रमवारी पिंपरी-चिंचवड शहराचा देशात 19 वा तर राज्यात चौथा क्रमांक लागला आहे. तर 10 लाख ते 40 लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या विभागात सर्वोत्तम अभिप्राय बद्दल देशात पिंपरी-चिंचवड पालिकेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. पण, याच शहरात आरोग्याच्या प्रश्नासाठी आरोग्य विभाग तेवढ्याच ताकतीने ड्रेनेज लाईनचा का प्रश्न सोडवत नाही?.

स्थानिक नागरिक अहमद मुजावर , कालिदास शिरसाट ,अशोक हडवले, ज्ञानेश्वर गोरे यांनी वेळोवेळी पालिकेकडे पत्रव्यवहार पण केलेला आहे. उपाध्यक्ष विकास शहाणे, मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर यांच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.