मोदी… मोदी… आणि मोदीच… थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
357

भाजपने गोरगरिबांना दिलेली आश्वासने आणि त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शब्द यावर लोकांनी पुन्हा एकदा जोरदार शिक्कामोर्तब केले. प्रचंड वाढलेली महागाई आणि बेरोजगारीने पेटलेल्या होळीत २०२४ मध्ये मोदी सरकार खाक होईल, अशी तमाम विरोधकांची अटकळ होती. खरोखर असे होईल का त्याचे उत्तर लोकसभेपूर्वी चार महिने अगोदरच मिळाले. चार राज्यांच्या निवडूणक निकालाने तोच संदेश दिला. भाजपच्या यशात महिला मतदारांचे योगदान खूप महत्वाचे राहिले हे अवर्जून नमूद केल पाहिजे.

राजस्थान आणि छत्तीसगड राज्यातील काँग्रेसचे सरकार गेले. मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग बघेल यांच्या चांगल्या कामामुळे छत्तीसगड पुन्हा मिळेल याची काँग्रेसला पूर्ण खात्री होती, पण तिथेही पानीपत झाले. मध्य प्रदेशात चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराज सिंह उर्फ मामा यांच्यावर नाराजी असल्याची माध्यमांतून बोंब होती. प्रत्यक्षात धो धो मतांनी तिथे पुन्हा भाजपलाच लोकांनी निवडूण दिले. दक्षिणेत तेलंगनात बीआरएस च्या केसी चंद्रशेखर राव यांचे मस्तवाल सरकार गेले आणि तिथे काँग्रेस जिंकली. हे सर्वच निकाल भाजपसाठी आशादायक आहेत. उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकिची ही सेमिफायनल मॅच भाजपने हसत हसत जिंकली. कुठेही मस्ती नाही की अतिआत्मविश्वास नाही. अचूक नियोजन, यंत्रणांचा पध्दतशीर वापर आणि सुप्तरित्या संघटनेचे नेटवर्क वापरून भाजपने बाजी मारली. सर्व यशाचे खरे मानकरी अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत. २०१४ पासून सुरू झालेला नरेंद्र मोदींचा करिष्मा अजून संपलेले नाही. आजही तो तितकाच कायम आहे, हे आता विरोधकांनी मान्य केले पाहिजे. मोदी आजही गोरगरिबांचीच भाषा बोलतात. एकही सुट्टी घेत नाहीत. सामान्यांच्या प्रश्नावर छातीठोकपणे आश्वासने देतात आणि पूर्ण करतात म्हणून लोकांना मोदीच आव़तात. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार हे नॅरटिव्ह इतके सेट केले की आजही मतदारांच्या मनात तेच कायम आहे. विरोधकांकडे मोदींच्या जवळपासचासुध्दा एकही नेता नाही, हे दुर्दैव आहे. देश मोदींच्याच हातात सुरक्षित राहू शकतो, याची खात्री लोकच देतात. हिंदुत्वाचा सर्वात प्रभावी पुरस्कार आणि त्या अनुशंगाने होणारे निर्णय हीसुध्दा जमेची बाजू आहे. मोदी-शाह या जोडगोळीच्या रणनितीला विरोधक आजही तोंड देऊ शकत नाहीत. अर्थात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स च्या कारवाया राजकीय सुडापोटी असतात हे जगजाहिर आहे. लोकांना त्या योग्यच वाटतात हे दिसले. खरे तर, या निवडणूक निकालाने भाजपचा आत्मविश्वास आता दुपटीने वाढला आहे. आज देशातील १७ राज्यांत भाजपचे सरकार आहे. आगामी काळात त्यात भर पडेल, इतकेच नाही तर लोकसभेला ३२५ जागांचे जे टार्गेट मोदी-शाह यांनी ठेवले ते गाठणे आता सोपे आहे.

महाराष्ट्रावर काय परिणाम होणार –
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगट ही राज्य महाराष्ट्राला लागून आहेत. तकडची हवा इकडे येऊ शकते. मार्च मध्ये लोकसभा झाली की सहा महिन्यांत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आणि लगोलग सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिकांच्या निवडणुका होतील. आता या सर्व निवडणुकांना भाजपचा आवाज मोठा असेल. राज्यात शिंदे-फडणवीस-पवार असे तीन पक्षांचे सरकार सत्तेत आहे. आता तिथे फडणवीस सांगतील तेच होणार. लोकसभेच्या ४८ पैकी २२ जागा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मागितल्या. आता तिथेही भाजपचा वाटा मोठा राहिल. शिंदे-फडणवीस यांची पूर्वी इतकी गरज राहणार नाही. भाजप म्हणेल ती पूर्व दिशा असेच होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे मंत्रीमंडल विस्तार असो वा जागावाटप यापुढे भाजपवर गुरगुरणे थांबेल. कदाचित देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री होतील. बरे तर बरे, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपच्या कमळावर निवडणुका लढाव्या लागतील. मध्य प्रदेशमध्ये भाजपने तोडफोड केली आणि सरकार बनवले होते, पण त्या घडामोडीनंतरही भाजप मोठ्या मताधिक्याने सत्तेत आले. महाराष्ट्रातसुध्दा भाजपने शिंदेंना बाजुला करून ठाकरेंची शिवसेना फोडली म्हणून जनतेची उध्दव ठाकरेंना सहानुभूती होती. राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार यांच्या बद्दल संताप आणि शरद पवार यांच्या बाजुने थोडिफार सहानुभूती होती. आता तसे काहीच होणार नाही याचे उदाहरण मध्यप्रदेशच्या निकालानेच दाखवून दिले.

लाडली बहन योजना हेच यशाचे गमक –
मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महिलांसाठी लाडली बहन योजनेतून दरमहा १२५० रुपये रोख खात्यात जमा करण्याचा निर्णय केला, तेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे. दरमहा तब्बल १ कोटी ४० लाख महिलांना सुरवातीला १२५० रुपये प्रति महा नंतर त्यात दरवर्षी वाढ करत करत ३ हजार रुपये पर्यंत देण्याची ही योजना आहे. तब्बल ५० टक्के महिला मतदारांनी त्यामुळेच भाजपला मतदान केले. भाजपला ४९ टक्के मते मिळालीत. चार वेळा मुख्यमंत्र राहुनसुध्दा शिवराजसिंह चौहान यांच्याबद्दल नाराजी नसल्याचे निकालानेच सांगितले. काँग्रेसने सिलेंडर ४०० रुपयांत म्हटले पण लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही.
छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे राज्य होते आणि मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांचे काम चांगले असल्याने पुन्हा सत्तेत येण्याची खात्री होती. प्रत्यक्षात महादेव बेटींग एप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई झाली आणि तोच प्रचाराचा मुद्दा झाला. भ्रष्टाचाराचा हा मुद्दा भाजपने लावून धरला आणि काँग्रेसचा निःपात केला.

राजस्थानात अशोक गेहलोत यांच्या अनेक निर्णयांवर ते मुस्लिम धार्जिने असल्याचे वेळोवेळी भाजपने दाखवून दिले. लाल डायरीचे प्रकऱण चक्क काँग्रेसच्याच आमदाराने पुढे आणले आणि गेहलोत यांची गोची केली होती. ते प्रकरणसुध्दा पराभवाला कारण ठरले. कन्हैय्यालाल यांचा शीरच्छेद झाला तो मुद्दा भाजपने वाजवल्यावर ५ लाखाची भरपाई गेहलोत यांनी दिला. दुसरीकडे अपघातात मृत मुस्लिम युवकाला ५० लाख दिल्याचा विषय भाजपच्या आरोपांना पुष्ठी देणारा ठरला. हिंदु-मुस्लिम मतांच्या ध्रविकरणाचाच इथे भाजपला फायदा झाला.