शहरातील दिव्यांगांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार

0
142

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) : दिव्यांग बांधवांसाठी विविध नाविन्यपूर्ण व पथदर्शी उपक्रम राबवून तसेच दिव्यांग विद्यार्थांना राज्य सेवा,केंद्रीय लोकसेवा आयोग यासारख्या परिक्षेकरीता उच्च शिक्षण, दिव्यांग नागरिकांना व्यावसायिक प्रशिक्षण, आणि रोजगार यासारख्या आवश्यक त्या संधी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे, सर्व दिव्यांगांना सुविधा देता याव्यात यासाठी शहरातील दिव्यांगांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले आणि जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उत्तम आरोग्यासाठी त्यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून दिव्यांग दिन साजरा करण्यात आला,त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमाला समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर,भारत सरकारच्या निवडणूक विभागाच्या ब्रॅड अ‍ॅम्बेसिडर सोनाली नवांगुळ,मन शक्ती प्रक्षिक्षक डॉ. दत्ता कोहिनकर,विशेष अधिकारी किरण गायकवाड,सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सॅडविक कोरोमंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पदाधिकारी किरण आचार्य,प्रहार अपंग क्रांती आंदोलन संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले, जागृत अपंग संघटनेचे अध्यक्ष मानव कांबळे,घरकुल अपंग संस्थेच्या पदाधिकारी संगीता जोशी काळभोर,दृष्टीहिन कल्याण संघाचे संतोष राऊत तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह यांनी मोरवाडी येथील दिव्यांग भवनाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल,त्यातील अंतर्गत सोईसुविधांचे काम सुरू आहे तसेच आवश्यक वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय, आरोग्य, यासारख्या पदांचे मनुष्यबळ पुरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या भवनासाठी समिती स्थापन करण्यात येणार असून त्यामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच तज्ञ मंडळींचा सहभाग असेल असेही आयुक्त सिंह म्हणाले.

जागृत अपंग संघटनेचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाबाबत महापालिकेचे आभार मानले. त्याचबरोबर दिव्यांग भवन लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे असे मतही व्यक्त केले.

सोनाली नवांगुळ यांनी बोलताना दिव्यांग व्यक्तींच्या समस्या,अडचणी प्रशासनाने समजून घेतल्या पाहिजेत तसेच यासाठी दिव्यांग आणि प्रशासन असे परस्परांमध्ये संवाद वाढले पाहिजेत असे मत व्यक्त केले.
सोनाली नवांगुळ ह्या गेली १५ वर्षे लेखन व मुक्त पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांची आजवर पाच अनुवादित व तीन स्वतःची अशी मिळून एकूण आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा स्वतःचा असा एक वाचकवर्ग संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. २०२० या वर्षांचा अनुवादविषयक पुरस्कार, २०२३ चा महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांचा विशेष पुरस्कार त्यांना लाभला आहे. मराठी भाषेतील पहिले नोंदणीकृत ब्रेल पाक्षिक स्पर्शज्ञान यासाठी उपसंपादक म्हणून काम करणेची संधी त्यांना मिळाली. २०१२ रोजी पुण्यात संपन्न झालेल्या अखिल भारतीय अपंग साहित्य समेलनांचे अध्यक्ष पद सोनाली यांनी भूषविले असून राज्य निवडणूक दूत (पी. डब्ल्यु. डी) स्टेट आयकॉन म्हणून निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून त्यांची निवड करण्यात आली आहे.

तर डाॅ.दत्ता कोहिनकर पाटील यांनी “मनाची अमर्याद शक्ती” या विषयावर विविध पैलूद्वारे दिव्यांगांना मार्गदर्शन केले.

डाॅ.कोहिनकर पाटील हे वेगवेगळ्या वर्तमानपत्रात संपादकीय पानांवर स्तंभलेखन करत असतात. मशागत या त्यांच्या पुस्तकाला बेस्ट सेलरचा दर्जा मिळालेला आहे. विपषना ध्यान केंद्राचे ते १४ वर्ष डायरेक्टर, २ वर्ष चेअरमन तसेच विश्व शक्ती इंटरनॅशनल फाऊंडेशनचे ते प्रमुख विश्वस्त आहे. त्यांची ओळख माईंड पावर ट्रेनर म्हणून असून स्ट्रेस मॅनेजमेंटच्या त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या “महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार” व भारत सरकारचा नेहरू युवा प्रेरणा पुरस्काराने त्यांना गौरविले आहे.
यावेळी विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिव्यांग बांधवांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मानाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या जलतरणपटू वैष्णवी विनोद जगताप, १४ वी राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत गोल्ड मेडल विजेता अनिश पाटील, १४ वी राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सिल्वर मेडल विजेता आदित्य राजपूत, १४ वी राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत ब्राँन्झ मेडल विजेता वैभव सोनटक्के, अरमान शेख, जिल्हास्तरीय मानसिक दिव्यांग चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता इमरान अन्सारी, जिल्हास्तरीय मानसिक दिव्यांग चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक विजेत्या ज्योती कांबळे, जिल्हास्तरीय सुगम संगीत गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या लावण्या पाटील, जिल्हास्तरीय सुगम संगीत गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक विजेत्या वैष्णवी कुंभार, जिल्हास्तरीय सुगम संगीत गीत गायन स्पर्धा उत्तेजनार्थ विजेते वेदांत उमाप तसेच पिंपरी चिंचवड कर्णबधिर असोसिएशनचे अध्यक्ष परशुराम बसवा, राज्यस्तरीय गोळा फेक आणि राज्यस्तरीय भाला फेक सुवर्णपदक, राज्यस्तरीय धावणे १०० मीटर धावणे स्पर्धा कांस्यपदक, आंतरराष्ट्रीय भालाफेक कांस्यपदक विजेत्या समृद्धी दौंडकर, राज्यस्तरीय ज्युडो फेक सुवर्णपदक, आंतरराष्ट्रीय ज्युडो फेक कांस्यपदक विजेते श्रेयस उबाळे, राज्यस्तरीय १०० मीटर धावणे रौप्यपदक, राज्यस्तरीय लांब उडी कांस्यपदक विजेते अनिकेत शेलार, राज्यस्तरीय गोळाफेक सुवर्णपदक विजेते ज्ञानेश्वर गायकवाड, ज्युडो फेक रौप्यपदक, आंतरराष्ट्रीय ज्युडो फेक कांस्यपदक विजेते साहिल लष्कारे, महिला जागतिक चॅम्पियनशिप २०२३ भारतीय अंध महिला फुटबॉल संघात निवड झालेल्या कोमल गायकवाड, भाग्यश्री रुग्गी, दिपाली कांबळे, मुस्कान गुप्ता, वेस्ट री युज या स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक विजेते सोहम देठे आणि प्रणव जायभाये, वेस्ट टु रि युज वॉटर कलर पेंटींग प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक विजेते संघर्ष कांबळे आणि हरीओम गावंडे, मुंबई येथे झालेल्या जिल्हा राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदक, जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत चौथा क्रमांक, पुणे मॅरेथॉन व सातारा मॅरेथॉनमध्ये पाच किलोमीटर अंतर पुर्ण करणारे सोहम जमादार, जिल्हा राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत सिल्वर मेडल विजेत्या आदिती गाडे यांचा समावेश होता तसेच विविध स्पर्धांमध्ये कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या सुदर्शन फटांगडे, सविता माटा, गजानन जगताप, स्वप्नाली जगताप, धानाजी साळुंखे, कोमल जाधव, किरण ओव्हाळ, पल्लवी शेलार, अनिकेत शेलार, स्वप्निल शिंदे, रोहन भारत साळवे, सोहम गायकवाड, संजना साळवे यांचाही सत्कारात समावेश होता.
या कार्यक्रमात दिव्यांगासाठी सामाजिक कार्यात हातभार लावणारे सॅडविक कोरोमंट इंडियाचे पदाधिकारी किरण आचार्य, सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ उमाप, रघूनाथ सावंत, विद्या नारायण तांदळे, स्मिता सस्ते, रमेश पिसे, अशोक भोर, संतोष सोनवणे, प्रशांत करवंदे, राजाराम पाटील, रेवनाथ कर्डिले, अस्लम मुलाणी, संजय गायके, स्वप्निल चव्हाण, किशोर जोशी यांचाही सत्कार करण्यात आला.

दुपारनंतरच्या सत्रात संगीत विशारद तुकाराम कुटे यांच्या सुगम संगीताचा कार्यक्रम झाला, त्यांनंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी,सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार सामाजिक कार्यकर्ते संजय गायके यांनी मानले.