मोदींचे नांव ‘आश्वासनबाज पंतप्रधान’ असे ठेवावे लागेल – अण्णा हजारे  

0
746

अहमदनगर, दि. ३० (पीसीबी) – भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भरपूर आश्वासने दिली होती, ती त्यांच्यातरी लक्षात आहेत का?, असा सवाल करून पंतप्रधान  मोदी आणि भाजप यांनी खूप आश्वासने दिली होती,  मात्र ती त्यांनी पाळली नाहीत,  त्यामुळे त्यांचे नाव ‘आश्वासनबाज पंतप्रधान’असे  ठेवावे लागेल,  अशी उपहासात्मक टीका  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज (बुधवारी) येथे केली.   

नरेंद्र मोदी यांच्या सरकारने लोकपाल नियुक्त करण्याचा निर्णय लवकर घ्यावा, असेही  अण्णा   यांनी म्हटले आहे. लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी  अण्णांनी  राळेगणसिद्धी  येथे आजपासून आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अण्णांची भेट घेण्यासाठी येणार होते. मात्र हजारे यांनी महाजनांना भेटण्यास नकार दिला आहे. यामुळे गिरीश महाजन यांचा राळेगणसिद्धी दौरा रद्द करण्यात आला आहे. गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांची याआधीही भेट घेतली आहे. आता अण्णा हजारेंनी गिरीश महाजन यांच्या हातात काही नसल्याचे सांगत भेट देण्यास नकार दिला आहे.