मॉल, मार्केट सुरू, क्रीडांगणेच बंद का ?

0
374

– क्रीडा समिती सभापती उत्तम केंदळे यांचा सवाल
– महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – लॉकडाऊन निर्बंध शिथिल होत असताना पिंपरी-चिंचवड शहरात गर्दी होणारे ठिकाणे, मॉल, सिनेमागृहे सुरू करण्यात आली आहेत. मात्र खेळाडू, प्रशिक्षक, नागरिक आणि शहराच्या क्रीडा संस्कृतीसाठी महत्वाची असणारी क्रीडांगणे मात्र बंद का? असा सवाल पिंपरी-चिंचवड महापालिकेचे क्रीडा सभापती उत्तम केंदळे यांनी केला आहे. तसेच कोरोना नियमांचे पालन करून शहरातील क्रीडांगणे तात्काळ सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबत लेखी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी क्रीडा समिती सभापती उत्तम केंदळे, माजी महापौर तथा नगरसेवक राहुल जाधव आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्रिडा विभागाच्या अखत्यारीतील २१ क्रीडांगणे व तत्कालीन प्राधिकरणाने आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने विकसित करून पालिकेकडे हस्तांतरित केलेली ४ अशी एकूण २५ क्रीडांगणे आहेत. मात्र, कोरोनामुळे सध्या बंद आहेत. सध्या निर्बंध बहुतांश शिथिल झाले आहेत मात्र, तरीही मैदाने खुली केली नाहीत. त्यामुळे क्रीडापटू आणि क्रीडा रसिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. सध्या खेळांची मैदाने पालिका क्रीडा विभागाने सरावासाठी खुली केली आहेत. ती पण फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्यात येतात. इतर सांघिक खेळाची मैदाने बंद आहेत. मैदाने का सुरू करत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडांगणे बंद ठेवण्यात आली असून ती सुरू करण्याबाबत शासनाकडून कोणतेच आदेश नसल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे क्रिकेट, ऑलम्पिक स्पर्धा होतात ; परंतु पिंपरी-चिंचवड मध्ये गेल्या दीड वर्षांपासून स्पर्धा झालेल्या नाहीत. कोरोनाचे नियम पाळून ही सर्व मैदाने सरावाबरोबरच स्पर्धेसाठी खुली करण्याची मागणी खेळाडू, प्रशिक्षक यांच्याकडून होत आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही करुन राज्य सरकारकडे महापालिका प्रशासनाने पाठपुरावा करावा आणि क्रीडांगणे स्पर्धांसाठी खुली करावीत, अशी मागणी आहे निवेदनात करण्यात आली आहे.