राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ चार बड्या नेत्यांच्या जावयावर आरोप; नेत्यांचे जावई आता सोमय्यांच्या निशाण्यावर

0
365

मुंबई, दि.२० (पीसीबी) : भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नवा आरोप केला आहे. हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील संताजी घोरपडे साखर कारखान्याप्रमाणे गडहिंग्लजमधील आप्पासाहेब नलावडे या कारखान्यातही बोगस कंपन्यांद्वारे घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. आप्पासाहेब नलावडे कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. यामध्ये किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या जावयाचंही नाव घेतलं आहे.

भाजपच्या किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत महाविकास आघाडीच्या किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार बड्या नेत्यांच्या जावयावर आरोप केला आहे. यामध्ये आज आरोप केलेले हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन हसीन मंगोली, नवाब मलिक यांचे जावई समीर खान, अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर आतापर्यंत आरोप केले आहेत. यापैकी मुश्रीफ वगळता सर्वांच्या जावयांना एक तर चौकशीला सामोरं जावं लागलं किंवा जेलमध्ये.

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन यांच्यावर बेनामी कंपन्यांद्वारे पैसे कमावल्याचा आरोप केला आहे. “मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत. या कंपनीत ७१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट लिमिटेडचे, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे”, असं किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे.

ब्रिक्स आणि सरसेनापती कारखान्यात ५० कोटींचे व्यवहार झालेत. हे व्यवहार अपारदर्शी आहेत. हे लिलाव कोणत्या पद्धतीने झाले, किती लिलावात सहभागी झाले हे सर्व अपारदर्शी आहेत, असं सोमय्या म्हणाले. या वर्षीच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मोठा झटका बसला होता. मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. दहा तासांच्या चौकशीनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समीर खान यांना अटक केली होती. जानेवारी 2021 मध्ये ही कारवाई झाली होती.

पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणात भाजपतून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे अडचणीत आहेत. याचप्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली. जुलै महिन्यात ईडीने त्यांच्यावर कारवाई करुन कोठडीत पाठवलं.

या महिन्याच्या सुरुवातीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्याचं वृत्त आलं होतं. वरळी इथल्या सुखदा इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी आले होते. त्यानंतर गौरव चतुर्वेदी बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयनं ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. अनिल देशमुख प्रकरणात यापूर्वी गौरव चतुर्वेदी यांचं नाव यापूर्वी कधीही आलं नव्हतं. मात्र, आता अचानक त्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.