मृतांच्या नावाने राजकारण काँग्रेसच्या या गिधाडांकडून शिका

0
232

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर करोनासंदर्भातील आकडेवारीवरुन केलेल्या टीकेला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधींना दिल्लीपेक्षा न्यू यॉर्कवर अधिक विश्वास आहे असा टोला हर्ष वर्धन यांनी लगावला आहे. इतकचं नाही तर त्यांनी काँग्रेस मेलेल्या व्यक्तींच्या नावाने राजकारण करत असल्याचा घणाघाती आरोपही हर्ष वर्धन यांनी केलाय.

हर्षवर्धन यांनी राहुल गांधींनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना काँग्रेसवर निशाणा साधलाय. “मृतांच्या नावाने राजकारण करणं काँग्रेसची पद्धत आहे. झाडांवरील गिधाडं सध्या दिसेनासी झाली अशली तर त्यांच्यातील ऊर्जा जमीनीवरील गिधडांमध्ये आल्यासारखं वाटत आहे. राहुल गांधींना दिल्लीपेक्षा न्यू यॉर्कवर अधिक विश्वास आहे. मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील ‘या’ गिधडांकडून शिकावं,” असं ट्विट हर्ष वर्धन यांनी केलं आहे.

राहुल गांधींनी अमेरिकेतील न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्राचा दाखला देत आकडे खोटं बोलत नाहीत पण भारत सरकार बोलतं असा टोला लगावला होता. न्यू यॉर्कमधील या वृत्तपत्राने भारत सरकार सांगत असलेले करोनाचे आकडे आणि प्रत्यक्षातील आकड्यांमध्ये तफावत असल्याचा दावा केला होता.

सोमवारी जवळजवळ ४० दिवसांनंतर दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली आल्यानंतर मंगळवारी या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे २ लाख ८ हजार ९२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २ लाख ९५ हजार ९५५ कोरोना रुग्ण मंगळवारी करोनामधून बरे झाले आहेत. सध्या उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या २५ लाखांच्याही खाली आली आहे. मात्र त्याच वेळेस कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण पुन्हा वाढल्याचं दिसून आलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे ४ हजार १५७ जणांचा मृत्यू झालाय. आरोग्यमंत्रालयाने बुधवारी यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची टक्केवारी ही १.१५ टक्के असल्याचं केंद्राचं म्हणणं आहे.