मुख्यमंत्री हे डोंबिवलीचे जावई आहेत, त्यांनी या शहरावर लक्ष द्यावे – राजू पाटील

0
318

ठाणे,दि.१२(पीसीबी) – मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे “डोंबिवलीतील वाढते प्रदूषण, शहरांच्या दुरावस्थेला जबाबदार एमआयडीसी या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा,” अशी मागणी केली आहे. “मुख्यमंत्री हे डोंबिवलीचे जावई आहेत. त्यांनी या शहरावर लक्ष द्यावे,” असा टोलाही राजू पाटील यांनी लगावला आहे.

गेल्या २५ वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून डोंबिवली शहरात वाढते प्रदूषण, अस्वच्छता, रस्त्यांची दुरावस्था, नाले तुंबणे यासाठी हेच अधिकारी जबाबदार आहेत. असा आरोपही राजू पाटील यांनी केला आहे.

“याबाबत आम्ही सतत आंदोलन करत असतो. एमआयडीसीतील प्रदूषण, कधी हिरवा पाऊस पडतो. कधी गॅस लीक होतो. या सर्व गोष्टींचा हिवाळ्यात याचा फार त्रास होतो. याबाबत आमच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. पण मध्यतंरी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काही अधिकारी आले होते. त्यांनी याबाबतचा आढावा घेतल्यानंत या ठिकाणी स्वच्छता नाही असे समजले. तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना अक्षरश: झापलं. त्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यात लक्ष द्यावे,” अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

हे मी कोणत्याही टीका करण्याच्या हिशोबाने बोलत नाही. मुख्यमंत्र्यांनी तरी याकडे लक्ष द्यावे. ते डोबिंवलीचे जावई आहेत. त्यांनी शहरावर लक्ष द्यावे आणि डोंबिवली शहर सुधारावे. अशीही मागणी राजू पाटील यांनी केली.