मुंबईतील नाल्यांजवळील चार मजली बेकायदा झोपडपट्ट्या तोडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
444

मुंबई, दि, २ (पीसीबी) – मुंबईमध्ये मागील दोन-तीन दिवसापासून पाऊस चालू असल्याने संपूर्ण मुंबई जलमय झाल्याने मुंबई कराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर नाल्यांजवळ  चार मजली बेकायदा झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे आम्ही आता कडक भूमिका घेऊन बेकायदा झोपडपट्ट्या तोडणार आहोत. पाण्याचा निचरा होण्यासाठी नाला मोठा करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळं मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईत जागोजागी पाणी तुंबले आहे. विरोधकांनीही या मुद्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पालिकेचा बचाव तर केलाच मात्र आगामी काळात कठोर पावले उचलण्याचे संकेत देखील दिले आहे.

पाण्याचा निचरा होण्यासाठी बेकायदा झोपड्यांचा मोठा अडसर ठरत आहे. त्यामुळे त्याविरोधात कठोर कारवाई करावी लागले असे ते म्हणाले. अतिक्रमणे झालेल्या ठिकाणी, नदी नाल्याच्या बाजूची बांधकामे याबाबतही कडक भूमिका घ्यावी लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईत नालेसफाई झाली नाही असे म्हणता येणार नाही. पावसाचे प्रमाण अत्यंत जास्त आहे, त्यामुळे नाले भरून वाहत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.