मिरविण्याची हौस असेल, तर स्वत:च्या पैशातून जाहिराती करा; दत्ता सानेंचा आमदार लांडगेवर निशाणा

0
848

                                 

 

 

 

 

 

 

 

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – भोसरीत भारतीय हवाई दलासाठी भरती अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने आर्थिक मदत केली असताना या कार्यक्रमाची प्रसिध्दी मात्र, भोसरीचे विद्यमान आमदार   महेश लांडगे करत आहेत. त्यांना एवढीच जर मिरविण्याची हौस असेल, तर त्यांनी हा सर्व खर्च वैयक्तीकरीत्या करावा व खुशाल जाहिराती कराव्यात, अशी टीका महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

याबाबत दत्ता साने यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की,  भारतीय हवाई दलासाठी भरती अभियान  भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह व भोसरी गावजत्रा मैदानावर आयोजित केले आहे. हा कार्यक्रम राष्ट्रहिताचा असल्यामुळे  महापालिकेच्या वतीने  मदत म्हणून मंडप, विद्युत व्यवस्था,  तात्पुरती ध्वनी व प्रकाश व्यवस्था करण्याकरीता सुमारे  ५० लाख २ हजार २४४ रुपये खर्चास  मान्यता  दिली आहे.

हा  कार्यक्रम राष्ट्रहिताचा तसेच स्थानिक बेरोजगार तरुणांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे  महापालिकेच्या वतीने  हा खर्च करण्यास काहीच हरकत नाही. परंतु  या कार्यक्रमाची प्रसिध्दी मात्र, आमदार  महेश लांडगे करत आहेत.  त्याच्या जाहिराती फ्लेक्स, फेसबुक, व्हॉटस् अप व इतर सोशल मीडियावर  फिरत आहेत. त्यांना एवढीच जर मिरविण्याची हौस असेल तर त्यांनी हा सर्व खर्च वैयक्तीकरीत्या करावा व खुशाल जाहिराती कराव्यात. आम्हाला त्याबद्दल आक्षेप असणार नाही.  परंतु महापालिकेच्या  खर्चावर स्वत:च्या जाहिरातीची पोळी भाजून घेणे, तेही राष्ट्रहितासारख्या कार्यक्रमात हे सन्मानिय आमदारांना शोभत नाही, अशी टीका साने यांनी केली आहे.