मावळ लोकसभा मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण; प्रशासन सज्ज

0
819

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २९) मतदान होत आहे. त्यासाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतदानासाठी संपूर्ण मतदारसंघात एकूण २ हजार ५०४ मतदान केंद्रे सज्ज आहेत. या मतदान केंद्रांवर एकूण १४ हजार ४८८ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. संवेदनशील आणि उपद्रव होऊ शकेल, अशा मतदान केंद्रांवर व्हिडिओ शूटिंगसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातही अशाच प्रकारची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांचे एकूण २२ लाख २७ हजार ७३३ मतदार राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. त्यामध्ये ११ लाख ६५ हजार ७८८ पुरूष, तर १० लाख ६१ हजार ३१३ महिला मतदार आणि ३२ तृतीयपंथी मतदार आहेत.

मतदारांना घरोघरी व्होटर स्लिप वाटण्याचे काम सुरू आहे. मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री १९५० या क्रमांकावर कोणीही करू शकते. मतदान केंद्रात मोबाईलसह अन्य साहित्य वापरावर बंदी राहील. मतदानादिवशी सार्वजनिक सुटी आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले जाणार आहेत. दिव्यांग मतदारांना १०० मीटरच्या आत व्हीलचेअरची सोय करण्यात आली आहे. दिव्यांगांसह गर्भवती, वृद्धांसाठीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातही अशाच पद्धतीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.