देहुरोडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाला जबर मारहाण

0
687

देहुरोड, दि. २८ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तीन जणांच्या टोळक्यांनी लोखंडी पाईपने जबर मारहाण करुन हात आणि बोट फ्रॅक्चर केले. ही घटना शुक्रवार (दि.२६) रात्री साडेअकराच्या सुमारास देहुरोड येथील सुधिर इलेक्ट्रॉनीक्स या दुकानाजवळ घडली.

अमर दिपक सायसर (वय २२, रा. क्रांती बिल्डींग, अबुशेट रोड, मुंबई-पुणे रस्ता, देहुरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ज्योएल भास्कर पिलाणी (रा. साईनगर, देहुरोड) आणि त्याचे दोन अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी अमर सायसर हा देहुरोड येथील सुधिर इलेक्ट्रॉनीक्स या दुकानाजवळून पायी जात होता. यावेळी मागून दुचाकीवरुन आलेल्या ज्योएल पिलाणी आणि दोन अज्ञात साथीदारांनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन अमर याला लोखंडी पाईपने जबर मारहाण करुन हात आणि बोट फ्रॅक्चर केले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.