मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा खेळखंडोबा; पवार कुटुंबातील गृहकलहाने पुन्हा पराभव होणार?

0
1147

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीचा अभूतपूर्व खेळखंडोबा सुरू आहे. आधी संजोग वाघेरे, भाऊसाहेब भोईर, नंतर अजितदादांचे पुत्र पार्थ पवार आणि आता दिवंगत आर. आर. आबांची कन्या स्मिता पाटील-थोरात यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादीचे हसू होत आहे. अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव आघाडीवर असताना आता अचानक स्मिता पाटील-थोरात यांचे उमेदवार म्हणून नाव येण्यामागे पवार कुटुंबातील अंतर्गत गृहकलह कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु, या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादीचे निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ते मात्र प्रचंड वैतागले आहेत. आम्ही आता फक्त सतरंजी आणि चादरी उचलायच्या का?, असा संतप्त सवाल कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून एक नाव पुढे आले की ते काही दिवसांतच मागे पडते आणि नवीन नावाची चर्चा सुरू होते. या मतदारसंघात उमेदवार ठरता ठरत नसल्याने राष्ट्रवादीचे प्रचंड हसू होत आहे. आधी या मतदारसंघात राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचे नाव पुढे आले. त्यांनी मीच राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून जोषात कामालाही सुरूवात केली. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांचेही नाव चर्चेत होते. भोईर यांनी चाचपणीही केली. परंतु, आपल्या हाताला काहीच लागणार नसल्याची चिन्हे दिसताच भोईर यांनी बघ्याची भूमिका घेतली.

संजोग वाघेरे जोषात असतानाच अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव पुढे आले. खुद्द शरद पवार यांनी पार्थ पवार लढणार नसल्याचे सांगितले. तरी सुद्धा पार्थ पवार यांनी उमेदवारीच्या तयारीनेच पावले टाकत मतदारसंघात गाठीभेटी सुरूच ठेवल्या. अजितदादा पवार हे शरद पवार यांना आपले दैवत मानत असले तरी ते राजकीय निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे. त्यामुळे शरद पवार काहीही म्हणाले तरी अजितदादा आपले पुत्र पार्थ पवार यांना मावळच्या मैदानात उतरवणारच असे राजकीय जाणकारांचे स्पष्ट मत होते. त्यादृष्टीनेच पार्थ पवार यांची तयारीही सुरू होती. त्यामुळे पार्थ पवार हेच मावळमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार असणार असे चित्र निर्माण झाले होते.

पार्थ पवारांचे नाव आघाडीवर असतानाच आता मावळसाठी राष्ट्रवादीकडून दिवंगत आर. आर. आबांची कन्या स्मिता पाटील-थोरात यांचे नाव पुढे येत आहे. उमेदवारीसाठी स्मिता पाटील-थोरात यांना विचारणाही झाल्याचे बोलले जात आहे. स्मिता पाटील-थोरात यांचे नाव चर्चेत आणण्यामागे पवार कुटुंबातील अंतर्गत गृहकलह कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीत अजितदादा आणि शरद पवार असे दोन गट आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांचे नाव अजितदादा गटाकडून चर्चेत आणले गेले. त्यामुळे आता शरद पवार गटाने म्हणजे खासदार सुप्रिया सुळे गटाने स्मिता पाटील-थोरात यांचे नाव चर्चेत आणल्याचे मानले जात आहे.

मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी राजकीय ताकद आहे. परंतु, पवार कुटुंबातील चर्चेत असलेल्या गृहकलहामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे कार्यकर्तेही निरूत्साही झाले असून, प्रचंड वैतागले आहेत. मावळ मतदारसंघात प्रत्येकवेळी आयात उमेदवारच द्यायचा असेल, तर आम्ही शेवटपर्यंत सतरंज्या आणि चादरीच उचलायच्या आहेत काय?, असा संतप्त सवालही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत. राष्ट्रवादीची हीच स्थिती शिरूर लोकसभा मतदारसंघातही आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचा यंदाही विजय होणे अवघड असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.